Tuesday, May 3, 2022

‘फूड फेस्टिव्हल’आणि ‘फॅशन शो’ही

 

सोयरे सहचर : ‘फूड फेस्टिव्हल’आणि ‘फॅशन शो’ही

मला लहानपणापासून ग्रेटडेन या प्रजातीच्या कुत्र्यांविषयी आकर्षण होतं.




‘‘माझं बालपणी रुजलेलं प्राणिप्रेम मोठेपणी अधिकच वाढत गेलं आणि केवळ कुत्रीच नव्हे, तर अगदी उंट माझा दोस्त झाला नि खारुताईही! माणसांना चवीचं जेवू घालता घालता माझ्यातला शेफप्राण्यांसाठीही विविध पदार्थ करण्यात तरबेज झाला. मी या प्राण्यांसाठी फूड फेस्टिव्हलआयोजित केलं आणि बरोबरीनं फॅशन शोही. या सगळय़ाला भक्कम आधार होता, तो  त्यांनी मला दिलेल्या निर्मळ प्रेमाचा! ते प्रेम इतकं विलक्षण आहे, की माझ्या स्वभावातही त्यामुळे बदल झाला.’’ सांगताहेत  सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर.

लहानपणापासूनच माझं आणि मुक्या प्राण्यांचं जवळचं नातं! आजीच्या गोष्टींमधून भेटणारे प्राणी असोत की शाळेच्या पुस्तकातली आईनं म्हणून दाखवलेली ‘वेडं कोकरू’ ही कविता असो, या सगळय़ांमुळे मला प्राण्यांविषयी लहानपणापासूनच खूप आकर्षण निर्माण झालं. मग सगळय़ाच मुक्या प्राण्यांना भावना असतात हे जाणवू लागलं. रस्त्यावरची कुत्र्याची पिल्लं असोत की झाडावर येणारी गोजिरवाणी माकडाची पिल्लं असोत, त्या सगळय़ांचंच मला फार अप्रूप वाटू लागलं. सर्कशीतले प्राणी बघण्यासाठीची माझी धडपड आणि त्यांचे आवाज काढून बघणं, त्यांच्या नकला करणं यातच माझं सारं बालपण गेलं.


माझ्या अनुभवाप्रमाणे लहानपणी बहुतेक, अगदी ८० टक्के मुलामुलींना प्राण्यांच्या पिल्लांविषयी अतिशय आकर्षण असतं. कालांतरानं आवड बदलून कोणाला फक्त मांजरी आवडतात, तर कोणाला कुत्री आवडतात, काही जणांना भटक्या कुत्र्यांबद्दल प्रेम वाटायला लागतं.. मी असेही लोक बघितले आहेत, की रस्त्यात जखमी झालेली कुत्री घरात आणून त्यांच्यावर उपचार करणं, त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था करणं, औषधावर खर्च करणं हे करता करता एकेक करून जवळपास १५-२० कुत्री त्यांच्याकडे जमली. मग अशा कुत्र्यांसाठी वेगळं जेवण बनायला लागलं. काही लोक असे पाहिले, की ते स्वखर्चानं भटक्या कुत्र्यांना खायला घालतात. त्यातलाच मी एक. तेरा-चौदा वर्षांचा असताना आमच्या एका ओळखीच्या गृहस्थांनी दोन कुत्री भेट म्हणून दिली. बादल आणि बिजली असं त्यांचं नामकरण केलं. त्या वेळी आमच्या घरात जागा नसतानादेखील आम्ही त्यांना घरात आणलं, त्यांचे लाड करायला लागलो. मी रोज त्यांना फिरायला नेत असे. एकदा त्यातल्या एकाला अपचन झाल्यामुळे ते मरण पावलं आणि त्यापाठोपाठ दुसरंसुद्धा गेलं.. काही लोकांचं असं असतं, की एकदा पाळलेले प्राणी गेले की नंतर ते दुसरे प्राणी पाळत नाहीत; पण मी मात्र त्यातला नव्हतो. एकदा मला ‘कुकरी शो’ करण्याची बिदागी म्हणून ‘नागपूर महिला क्लब’च्या नायर यांनी डॅलमेशियन कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं. आम्ही हौसेनं त्याचं नाव बाबूराव ठेवलं. एवढंच नव्हे, तर तो एक वर्षांचा झाल्यावर त्याच्या वाढदिवसाला आमच्या इथल्या श्रेयशचासुद्धा वाढदिवस होता, त्या वेळी फक्त डॅलमेशियन कुत्र्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. वाढदिवसाचा मेनूसुद्धा ‘ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट’ या थीमवर होता आणि मीही काळय़ापांढऱ्या थीमचाच कुडता घातला होता!

मला लहानपणापासून ग्रेटडेन या प्रजातीच्या कुत्र्यांविषयी आकर्षण होतं. आमच्या बाबांनी ‘वल्र्ड इनसायक्लोपीडिया’चे वेगवेगळे १० खंड आणले होते, त्यामध्ये ‘डी’ खंडात ‘डॉग’ या विषयावर बरीच माहिती आणि फोटो होते. त्यातल्या ग्रेटडेनच्या प्रेमात मी पडलो. किती तरी वर्ष तो फोटो बघून, त्याची माहिती वाचून काढत होतो. कालांतरानं कोणी तरी एका ‘ग्रेटडेन’ कुत्र्याबद्दल माहिती दिली आणि मी जाऊन तो पाच हजार रुपयांत घेऊन आलो. काळी कुळकुळीत अशी ती कुत्री. तिचं नाव आम्ही सारंगा ठेवलं. मला मुकेशची गाणी आवडायची. त्यांचं ‘सारंगा तेरी याद में’ हे गाणं तर खूपच आवडीचं. त्यामुळे या कुत्रीचं नाव सारंगा! या सारंगानं नंतर कालांतरानं एकदा ८ आणि दुसऱ्यांदा १६, अशी २४ पिल्लं दिली. ती पूर्वीपासूनच शांत स्वभावाची होती. तिनं कधी कुणालाही चावल्याचं मला आठवत नाही. फक्त नवीन माणूस आला, की त्याचा वास घ्यायची. क्वचित एखाद्याच्या खांद्यावर दोन्ही पंजे ठेवून त्याला हुंगायची; पण तिच्या या कृतीमुळे समोरची व्यक्ती गर्भगळीत व्हायची!

 माझ्यावर तिचं विशेष प्रेम होतं. तिला एक वेळ खायला मिळालं नाही तरी चालेल, पण मी तिच्याबरोबर एक-दीड तास खेळायलाच हवं, असा तिचा आग्रह असे. नाही तर ती रुसून बसायची. कधी बाहेरगावी जाणं झालं तर पहिले एक-दोन दिवस ती जेवायची; पण त्यापेक्षा जास्त दिवस बाहेर राहिलो तर मात्र तिचं उपोषण सुरू व्हायचं! तिला माझ्या आवाजाची आणि शिट्टीची एवढी सवय झाली होती, की माझा आवाज ऐकला की ती कुठेही असली तरी लगेच ‘अलर्ट’ व्हायची. त्या वेळी स्पीकर फोन होते आणि आमच्या घराच्या खाली मिलिंद देशकर यांचं ऑफिस होतं. जाता-येता माझी बैठक तिथे असे. त्यामुळे सारंगासुद्धा आसपास असायची. मी जरी नसलो, तरी सारंगा ठरावीक वेळी त्या ऑफिसमध्ये जाऊन बसायची. तिथल्या लोकांना तिची सवय झाली होती, पण बाहेरून येणारे लोक मात्र घाबरून जायचे, कारण एकूण तिची अंगकाठी नेहमीच्या कुत्र्यांप़ेक्षा बरीच मोठी होती. मग अशा वेळी ऑफिसमधली मंडळी मला फोन करत आणि स्पीकर फोनवर मी तिला उठायला सांगत असे. माझा आवाज ऐकल्यावर ती लगेच उठायची आणि मला शोधत बाहेर पडायची. त्या काळात आमच्याकडे केटिरगच्या सामानाची

ने-आण करायला टेम्पो ट्रॅव्हलर होता. त्यातून आम्ही मित्रमंडळी कधी तरी फिरायलासुद्धा जायचो. त्या वेळी सारंगाला एक वेगळी सीट असायची आणि ती त्यावर बसूनच आमच्याबरोबर यायची. अशाच एका ट्रिपमध्ये आम्ही एका ठिकाणी पाण्यात उतरलो, पोहत-पोहत दूर आत आत गेलो. मी दुरून सारंगाच्या हालचाली बघत होतो. काठावर उभ्या असलेल्या तिची नजर सतत माझ्यावर होती. मी तिची गंमत करायचं ठरवलं आणि पाण्याच्या आत डुबकी मारून थेट दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. तिची नजर मला शोधत होती. बरीच डोकी पाण्यात तरंगत असल्यामुळे तिला मी दिसलो नाही तेव्हा मात्र तिनं मागचा-पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली आणि मला शोधू लागली. जसा मी दिसलो तशी परत ती काठावर परतली! दुसरा प्रसंग माझा मुलगा, आदिनाथ लहान असतानाचा. मी आणि माझी पत्नी अपर्णा त्याला कडेवर घेऊन घराबाहेर उभे होतो. त्या वेळी माझा एक मित्र आला आणि त्याच्या टू-व्हीलरवर आदिनाथला बसवून चक्कर मारायला घेऊन गेला. सारंगानं ते पाहिलं आणि लगेच माझ्या हाताला दातानं पकडून ओढायला लागली. मी ओळखलं, की तिला त्या मित्रानं आदिनाथला नेलेलं आवडलेलं नाही. मी अपर्णाला तसं म्हटलंसुद्धा; पण ती म्हणाली, ‘‘काहीही सांगू नको! असं काही नाही.’’ पण खरंच पाच मिनिटांनी आदिनाथ परत आल्यानंतरच सारंगा शांत झाली. या प्रसंगावरून माझ्या लक्षात आलं, की सारंगा जेवढी माझ्याशी जोडली गेली होती, तेवढीच घरातल्या इतर लोकांशीसुद्धा तिची नाळ जुळलेली होती. ती जेव्हा घरात आली, तेव्हा आमचं घर छोटं होतं. बैठकीच्या खोलीत जो दिवाण होता, त्यावर माझी आई दुपारचा आराम करायची आणि सारंगा त्या दिवाणच्या खाली झोपायची. तेव्हा आईशिवाय  दुसरं कोणीही दिवाणावर बसलेलं तिला चालत नसे. कुणी बसलंच तर मोठय़ानं गुरगुरून ती आपला राग दर्शवीत असे. आणखी एक गोष्ट आठवते. मी नागपूरमध्ये मोदी नं. ३- बर्डी इथे रहायचो. सकाळी साडेदहा वाजता ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर’च्या आवारात असलेल्या आमच्या ऑफिसमध्ये जायचो. घराच्या खालच्या मजल्यावर असलेल्या दुकानात दोन मिनिटं बसून पुढे आमचा एक मित्र राहायचा शिरीष पंडित, त्याच्याकडे जायचो. कधी कधी ‘न्यू बुक डेपो’मध्येसुद्धा जायचो. अशी फेरी करून ‘इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर’ गाठायचो. मी त्यासाठी दुचाकीच वापरत असे. आमच्या घरापासून इन्स्टिटय़ूशन हे अंतर जवळपास तीन किमी आहे. हे सारंगाला कसं समजलं देव जाणे, पण कधी घराचा वरचा दरवाजा उघडा राहिला तर ती बाहेर पडून मी जिथे-जिथे जायचो तिथे-तिथे जाऊन बसायची आणि शेवटी इन्स्टिटय़ूशनला यायची. मी तिथे दिसल्याबरोबर तिला झालेला आनंद मला दिसायचा, जाणवायचा; पण त्याबरोबरच तिच्या मनातली अपराधीपणाची भावनासुद्धा कळायची, की मी पळून आलेय, आता मला मार बसणार! असं प्रेम फक्त प्राणीच करू शकतात.

एकदा अपर्णा ड्रेसिंग टेबलजवळ बसून केस विंचरत होती आणि सारंगा बाजूला बसून एकदा आरशात आणि एकदा तिच्याकडे आश्चर्यानं बघत होती! तिचं तसं बघणं पाहिलं आणि मनात विचार आला, की जसं आपल्याला नटणं-मुरडणं आवडतं तसं प्राण्यांनाही आवडत असेल का? तो विचार मनात आल्याबरोबर मी ‘वल्र्ड अ‍ॅनिमल डे’च्या निमित्तानं प्राण्यांसाठी ‘फॅशन शो’ आयोजित केला. तो बराच गाजला. अगदी ‘बीबीसी’नंसुद्धा त्याची दखल घेतली.  पुढे एकदा नागपुरात ‘ऑल इंडिया व्हेटरनरी’ यांची परिषद होती. त्यानिमित्तानं संपूर्ण भारतातून बरेच प्राणीही तिथं आणण्यात आले होते. हत्ती, बैल, गाई, रेडे, बकरे, कुत्री, इमू, बदकं असे बरेच प्राणी होते. तेव्हा मी विचार केला, एका वेळी एका ठिकाणी एवढे प्राणी एकत्र येणं दुर्मीळ आहे. त्यांच्यासाठी आपण ‘फूड फेस्टिव्हल’ केलं तर? मी त्या कामाला लागलो. ते फूड फेस्टिव्हलही गाजलं.

ती कल्पनाही मला सारंगामुळेच सुचली होती. मी शाकाहारी असल्यामुळे सारंगासुद्धा शाकाहारी झाली. पण दर रविवारी तिच्यासाठी मी काही तरी वेगळं बनवायचो. मग त्यामध्ये वेगवेगळय़ा भाज्या, सोयाबीन, बटाटे, कणीक, हळद इत्यादींचा वापर असायचा. ते जेवण तिला फार आवडायचं. मी ते बनवायला लागलो की तिचा उत्साह बघण्यासारखा असायचा. यावरून मी प्राण्यांसाठी वेगवेगळय़ा पद्धतीचं जेवण बनवलं. त्यासाठी थोडा अभ्यासही करावा लागला. कुठल्या प्राण्यांना काय आवडतं, काय चालतं, हे सगळं लक्षात घेऊन पदार्थ तयार केले आणि त्यांना खायलाही घातलं.

 माझ्याकडे बादल आणि बिजली ही कुत्र्यांची जोडी होती तेव्हा मी त्यांना फिरायला न्यायचो. तेव्हा असं ठरवलं होतं, की यांना पिल्लं झाली की सर्वाना मी एकत्र फिरायला घेऊन जाईन; पण बादल आणि बिजली अकाली गेल्यामुळे हे स्वप्न काही पूर्ण झालं नाही. मात्र सारंगानं जेव्हा १६ पिल्लं दिली तेव्हा मी त्या सगळय़ा पिल्लांना घेऊन फिरायला गेलो होतो! सारंगानं दोन दिवसांत एवढी पिल्लं दिली. तिचं हे बाळंतपण मलाच करावं लागलं होतं. त्या वेळी आमच्याकडे एक मुलगा होता कवडू, तोही श्वानप्रेमीच. सकाळी ६ वाजल्यापासून तिनं पिल्लं द्यायला सुरुवात केली, तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ पर्यंत पिल्लं देत राहिली. या पूर्ण वेळेत आम्ही दोघं तिच्या आजूबाजूलाच होतो. दोन-तीन दिवसांनंतर लक्षात आलं, की एवढय़ा पिलांना दूध पाजणं तिला शक्य नव्हतं. म्हणून तिनं हळूहळू पिलांना दूध देणं कमी केलं. त्यात जी थोडी चंट, हुशार पिल्लं होती, ती आधीच दूध पिऊन घ्यायची. डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, की पिलांना बाटलीनं दूध पाजा. सुरुवातीला दोन बाटल्यांनी दूध पाजायचो. नंतर आम्ही एक ट्रिक केली आणि चार बाटल्यांचा स्टँड तयार केला. मग मी छोटय़ा खोलीत पाय समोर घेऊन बसायचो, मांडीवर तो स्टँड ठेवून चार-चार पिलांना त्यानं दूध पाजत होतो. ज्यांचं दूध पिऊन झालं आहे, त्यांना पायाच्या दुसऱ्या बाजूला टाकायचं! असं दिवसातून चारदा आणि रात्री दोनदा करायचं. हळूहळू त्या पिलांना माझी, माझ्या वासाची सवय झाली असावी. मी त्या खोलीत आलो की सगळी पिल्लं भोवताली गोळा व्हायची. त्यांना रोज दूध देताना मला त्यांचे स्वभाव कळू लागले. मग त्यातली काही पिल्लं आवडती, काही नावडती झाली! या सगळय़ा श्वानप्रेमापासून मला एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली ती ही, की पाळीव प्राण्यांना प्रेम हवं असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना कितीही रागावलं किंवा मारलं तरी ते तुमच्याशी प्रेमानंच वागतात. त्यांचं हे आचरण बघून माझ्यातसुद्धा बदल झाल्याचं लक्षात आलं.

माझ्याकडे पाळीव उंटही होता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल! जवळपास तीन वर्ष हा उंट माझ्याकडे पाहुणा म्हणून राहत होता. एकदा रस्त्यानं जात असताना एक राजस्थानी गृहस्थ उंट घेऊन चालला होता. मी सहज त्याची चौकशी केली की, ‘कहाँ से आ रहे हैं, कहा जा रहे हैं’ वगैरे. त्यानं सांगितलं, ‘राजस्थान से उंट लेकर आया था. लेकीन पैसे खत्म हो गए. अब इसे बेचने जा रहा हूँ!’ त्या उंटाला तो खाटकाकडे नेत होता. मी मागचा-पुढचा विचार न करता तो उंट विकत घेतला आणि त्याला तीन वर्ष थाटात ठेवलं. अर्थात हे शक्य झालं, ते आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेमुळे. ‘विष्णूजी की रसोई’ या आमच्या रेस्टॉरन्टमध्ये लहानांपासून-मोठय़ांपर्यंत सगळेच लोक येतात. त्यांना सतत काही तरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. लहान मुलांसाठी आम्ही छोटंसं पार्क तयार केलं आहे, तिथे आता एक गाढवाची जोडी आणतो आहे, जेणेकरून मुलांना ‘डाँकी’ म्हणजे काय हे कळेल!

जाता-जाता आमच्या खारुताईंबद्दल सांगतो, आमचं घर बऱ्यापैकी मोठं आहे आणि कौलारू आहे. वाडा संस्कृती असल्यामुळे घरात छताखाली बऱ्याच मोकळया जागा, खाचखळगे आहेत. पोपट, पक्षी, खारुताई, कबुतरं यांचं बरंच वास्तव्य असतं. घराच्या आजूबाजूला आठ-दहा प्रकारच्या फळांची झाडंही आहेत. एकदा एक खारुताई घरात छताला लागून असलेल्या पोकळीत घरटं बांधत होती. माझ्या लक्षात आलं, की लवकरच हिला पिल्लं होतील. कालांतरानं तिनं पिल्लं दिली. पिल्लं जशी-जशी मोठी होऊ लागली तशी त्यांचा आवाज वाढू लागला. कदाचित वजनसुद्धा वाढलं असावं आणि एकदा रात्रीच्या वेळी ते घरटं खाली पडलं. सकाळी उठून बघतो, तर आधी एक पिल्लू, मग दुसरं, तिसरं, चौथं अशी पाच पिल्लं सापडली. बरोबर त्यांचं मऊशार घरटंसुद्धा सापडलं. ते इतकं मऊ होतं आणि इतकं विविध प्रकारचं गवत आणि स्वत: खारुताईचे केसही त्यात होते, ते पाहून आश्चर्य वाटलं. नशिबानं सर्व पिल्लं जिवंत होती. खारुताईला शोधलं, तर ती अस्वस्थपणे आरडाओरड करत पळत होती. मी सगळी पिल्लं एका टोपलीत कापसाच्या गादीवर ठेवली आणि ती टोपली खारुताईला दिसेल अशा ठिकाणी ठेवून दिली. आश्चर्याची गोष्ट अशी, की खारुताई तिथे आली, पिल्लांना दूध पाजलं आणि निघून गेली. अर्ध्या तासानं एकेका पिल्लाला तोंडात पकडून तिनं कुठं नेलं माहीत नाही, मात्र त्यांचा आवाज काही दिवस येत होता. या गडबडीत एक पिल्लू तिथेच राहिलं. मग मी त्याला ड्रॉपरनं, कापसाच्या बोळय़ानं दूध पाजण्याचा प्रयत्न केला. ते पिल्लू हळूहळू माझ्याजवळच मोठं झालं, माझ्या खांद्यावर, खिशात कुठेही ते बसायचं. कानाला खाजवून घ्यायला त्याला फार आवडायचं. दिवसभर बाहेर हुंदडून संध्याकाळी गुपचूप त्याच्या जागी येऊन बसायचं. आम्ही त्याला पोळी, भात वगैरे देत असू. तर तात्पर्य असं, की प्राणी कितीही लहान किंवा मोठा असो, त्याला तुम्ही लळा लावला तर तो तुमचाच होऊन जातो.

 माझ्या आयुष्यात आलेल्या प्राण्यांनी मला केवळ निर्मळ, नि:स्वार्थी प्रेम दिलं. ही अनुभूती निराळीच आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, की प्राण्यांना ‘फॅशन’ म्हणून पाळू नका. त्यांचं दुखलं-खुपलं बघा आणि त्यांच्यावर निव्र्याज प्रेम करा! जसं ते आपल्यावर करतात.

No comments:

Post a Comment